बोरपाडळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे ‘आळोबाच्या नावाने चांगभलंच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आज आळोबानाथांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने पार. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली, संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

सोहळ्यामध्ये घोडे, रथ, उंट यांचा समावेश होता. आटपाडी (जि. सांगली) येथून १०० जणांचे खास पारंपरिक पथक आले होते. सेवागिरी महाराज पथकाचे जाधव महाराज प्रमुख होते. रस्त्यावरून स्वागत कमानी व आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. प्रमुख मार्गावरून पाच ते सहा तास दिंडी सोहळ्यांची मिरवणूक सुरू होती.

दिंडी सोहळ्यामध्ये केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शिशू विहार शाळेचे पथक.श्रीमती.भा.रा यादव हायस्कूल लेझीम पथक, श्री आळोबानाथ भजनी मंडळ व बालभारती वाद्यवृंद सातवे, श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी कराड मुली, महिला मंडळ पथके सहभागी झाले होते. एसटी स्टँड चौकात भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला.

मिरवणुकीच्या शेवटी भगतसिंग चौकात भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ तसेच आटपाडी मंडळाचे वारकरी, टाळकरी मंडळींच्या टाळ मृदुंगाच्या गजर करण्यात आला. यावेळी हजारो भक्तांनी श्री आळोबानाथांचे दर्शन घेतले. तर कु.अमृताताई सातारकर यांच्या काला कीर्तनाने सांगता झाली. दिवसभर मंदिरामध्ये गर्दी होती. दुपारी 1.30 पासून महाप्रसादाचे शिवाजी चौकात वाटप झाले असून याचा लाभ पंधरा ते वीस हजार भक्तांनी घेतला.