मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली होती. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्र तुरुंगात घालावी लागली. आता अल्लू अर्जुनची सुटका झाली असून तो तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अल्लू अर्जुन काय म्हणाला..?

अल्लू अर्जुन म्हणाला की, मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. कायद्याचा मी सन्मान करतो. मी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्या दुर्घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेबाबत मी दु:ख व्यक्त करतो. मी त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ती दुर्घटना फार दुर्दैवी होती. आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. घडलेली दुर्घटना ही मुद्दामहून घडवून आणलेली नव्हती. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. दुर्दैवी अपघात झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घडलेल्या दुर्घटनेबाबत आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्याबाबत क्षमा मागतो असं अल्लू अर्जुन म्हणाला आहे.

सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पुष्पा २ फेम अल्लू अर्जुनला सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.