नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चारही दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने सांगितले की, चारही दोषी 14 वर्षांपासून तुरुंगात आहेत. तसेच, न्यायालयाने चारही दोषींच्या अपीलवर निर्णय होईपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित केली आहे.

सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात साकेत न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत सिंह आणि अजय कुमार हे चार दोषी लोक दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना 23 जानेवारीला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.

यापूर्वी, 26 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांच्यासह चारही दोषींना कलम 302 (हत्या) आणि कलम 3 (1 ) अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याशिवाय त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला होता. तथापि, सौम्या विश्वनाथनच्या हत्येतील पाचवा दोषी अजय सेठी याला आयपीसी कलम 411 (अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता मिळवणे) अंतर्गत केवळ तीन वर्षांची शिक्षा झाली.

काय होते संपूर्ण प्रकरण ?

सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे 3:30 वाजता कारमधून घरी जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी हत्येमागील हेतू केवळ दरोडा असल्याचा दावा केला होता. सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक करण्यात आली आहेत.

हे सर्व आरोपी मार्च 2009 पासून तुरुंगात आहेत. दिल्ली पोलिसांनी या सर्व आरोपींवर मकोकाही लावला होता. आयटी प्रोफेशनल जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रावरूनच विश्वनाथन हत्या प्रकरणाचे गूढ उकलले जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले होते.