कोल्हापूर (प्रतिनिधी ) – गारगोटीतील राहत्या घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आकुर्डे येथील मंजूर एमआयडीसीची तब्बल 27 एकर जागा हडप करणारे आमदार इतरत्र एमआयडीसीत काम करणाऱ्या युवकांचे केवळ मतांसाठी मेळावे घेऊ लागले आहेत. मंजूर असलेली ‘एमआयडीसी’ची जागा स्वतःच्या फायद्यासाठी हडप करता आणि मग रोजगार निर्मितीवर कशाला बोलता ? असा घणाघात माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार आबिटकर यांच्यावर केला.
पांगिरे येथील प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेत केवळ युवक आणि बेरोजगारीला केंद्रस्थानी ठेवून के. पी. पाटीलयांनी आबिटकर यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, “मतदार संघात गेल्या दहा वर्षांत यांनी एकही उद्योग किंवा विकासाचा प्रकल्प राबविला नाही. याउलट आकुर्डे येथे माजी आमदार बजरंग देसाई आणि आमच्या प्रयत्नातून मंजुर केलेली एमआयडीसी यांनी रद्द करून युवक कसा बेरोजगार राहील असेच प्रयत्न केले. परिणामी इथले युवक रोजगारासाठी कोल्हापूर पुणे मुंबई अशा शहरांकडे धाव घेत आहेत. जर विद्यमान आमदारांनी असे प्रकल्प शासनाला उभा करण्यास भाग पाडले असते तर इथल्या युवकाला इथेच रोजगार मिळाला असता ; परंतु यांना युवक केवळ मतदान आणि प्रचारासाठी हवे असून त्यांचे युवकावरील प्रेम हे निव्वळ ‘पूतणा मावशीचे’ आहे हे आता लपून राहिलेले नाही. एवढेच नाही तर एमआयडीसीसाठी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाचे तसे शेरे असूनही आपण हडप केलेल्या जमिनीवरचे शेरे मात्र सत्तेच्या जोरावर शासनाकडून काढून घेणाऱ्या या लँड माफिया आमदारांचा जमीन घोटाळा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही समजला आहे.”
अशोकराव साळोखे यांनी स्वागत आणि विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. जगदीश पाटील,अश्विनी भोपळे, बाळासाहेब जाधव, अशोक यादव, सचिन पाटील यांची भाषणे झाली. बाळासाहेब डेळेकर,रमेश गायकवाड, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.