दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. निमित्त जरी वाढदिवसाचं असेल, तरी यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अजित पवार घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी दाखल झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. या भेटीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल भाष्य केले.

काय म्हणाले अजित पवार..?

आम्ही शरद पवारांसोबत अनेक विविध विषयांवर चर्चा केली. इथे काय सुरु आहे, तिथे काय सुरु आहे, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. परभणीला काय घडलं यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली. चहा पाणी नाश्ता झाला, आता निघालो, असे अजित पवारांनी म्हटले.

पुढे पवार म्हणाले, आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. १२ डिसेंबरला सर्वजण भेटत असतात. साहेबांचे दर्शन घेतात. शुभेच्छा देतात. आम्हीही त्यासाठी आलो होतो, असेही अजित पवारांनी म्हटले.