पुणे : सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा घराणेशाहीमध्ये निवडणूक रंगणार आहे.युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून थेट अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना त्यांच्या काकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “अजित पवार यांनी सात वेळा ही जागा जिंकली आहे.हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच घडले आहे.पण पक्ष फोडणे हे अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी पाऊल आहे.मला वाटते की हे सर्व कुटुंबात घडले ही एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना होती.पण शरद पवार यांच्यासोबत आम्ही नेहमीच होतो आणि भविष्यातही राहू.कुटुंबप्रमुख शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचीच राजकीय उंची वाढली आहे.पक्षात जे काही घडले ते संपूर्ण भारताने पाहिले आहे.
युगेंद्र पवार म्हणाले,“आम्ही सर्वांनी पवार साहेबांसोबतच राहायचे ठरवले,कारण ते राष्ट्रवादीचे खरे संस्थापक आहेत,ते कुटुंबाचे प्रमुख आहेत.त्यांच्यामुळे बारामतीच नव्हे तर आजूबाजूचे सर्व लोक समृद्ध झाले आहेत.काकांविरुद्धची लढत अवघड नसली तरी सोपीही नाही.सुरूवातीला शरद पवार साहेब अजित पवारांना साथ देत होते,पण बारामतीची जनता पवार साहेबांच्या पाठीमागे आहे आणि हेच त्यांनी लोकसभेत दाखवून दिले आहे.आगामी विधानसभा तसेच इतर निवडणुकांमध्ये पाठिंबा देऊन ते इतर पक्षांना खरी राष्ट्रवादी कुणाची हे त्यांना दाखवून देतील,असा टोलाही युगेंद्र पवार यांनी यावेळी लगावला आहे.