मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जसजशी निवडणूका जवळ येत आहेत तसतशी उमेदवार ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. सर्वत्र प्रचार, सभा सत्र सुरु आहे. अशातच आता सर्वाधिक लक्षवेधी मतदार संघ हा बारामती मतदार संघ बनला आहे . बारामतीत राज्यातील सर्वात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पवार विरुद्ध पवार याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा बारामतीत सुरु होणार आहे. बारामती मतदार संघातून उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तर शरद पवार गटातून युगेंद्र पवार उतरणार आहेत यामुळे या लढतकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच अजित पवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवार भावूक झाल्याचंही दिसून आलं.
काय म्हणाले अजित पवार..?
अजित पवार म्हणाले, लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय, अशी भावनिक सादही बारामतीकरांना अजित पवारांनी घातली.
अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच एक कार्यकर्ता उठला आणि विचारले दादा खासदाराला निधी किती असतो. त्यावर अजित पवारांनी बारीक आवाज काढून पाच कोटी सांगितले. बघा दादा किती बदलला आहे? आधीचा दादा असता तर आवाज वाढवून बोलला असता, असे म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, एक कार्यकर्ता म्हणाला दादा याला (लहान मुलाला) तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले आता काय मिठी मारू का? मात्र अजित पवारांच्या लक्षात येताच बेटा बस असे धीरगंभीर आवाजात अजित पवार म्हणाल्याचेही पाहायला मिळालं.
पुढे पवार म्हणाले, मागे मी चूक केली, आता चूक कुणी केली? आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका. तुटायला वेळ लागत नाही, असे म्हणत बारामतीमधील विधानसभेच्या निवडणुकीवरुन अजित पवार भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बारामतीची निवडणूक यंदा जेवढी चुरशीची आहे, तेवढीच भावनिकही होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभेला अजित पवारांची झाली मोठी हार
बारामती लोकसभा निवडणूक सर्वांच्या लक्षात राहणारी निवडणूक आहे. यावेळी अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची लढत पाहायला मिळाली, यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना मोठ्या हारला सामोरे जावे लागले होते आता विधानसभेला नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.