नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) T-20 क्रिकेट विश्वचषक जिंकणारी टीम इंडिया मायदेशी परतली आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने या संघाला भारतात आणण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने अमेरिकेतून भारताला जाणारे त्यांचे नियोजित विमान रद्द केले आणि या विमानाचा वापर टीम इंडियाच्या खेळाडूंना बार्बाडोसहून घरी आणण्यासाठी करण्यात आला.
नागरी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने या संदर्भात टाटा समूहाच्या विमान कंपनीकडून उत्तर मागितले आहे. टीम इंडियाला घेऊन जाणारे बोईंग 777 विमान बुधवारी ब्रिजटाऊनच्या ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत उतरले. बीसीसीआयने यासाठी विमान भाड्याने घेतले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने 2 जुलै रोजी नेवार्क-दिल्ली दरम्यानची फ्लाइट क्रमांक AI 106 रद्द केली होती. डीजीसीएने एअर इंडियाला हे विमान चालवण्याची परवानगी दिली होती पण आता अमेरिकेत अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एअर इंडियाने कोणती पावले उचललीत, अशी विचारणा त्यांनी केली आहे. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियामकाने एअर इंडियाला अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी काय पावले उचलली हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. विमान कंपन्यांना चार्टर उड्डाणे चालवण्यासाठी DGCA कडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
बार्बाडोस ते दिल्ली या 16 तासांच्या प्रवासात टीम इंडियाने काय केले ?
डीजीसीएने एअर इंडियाच्या फ्लाइट क्रूला त्यांच्या नियोजित ड्यूटीच्या वेळेपेक्षा जास्त काम करण्यासाठी विशेष सूट दिली आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही या अटीवर नियामकाने ही परवानगी दिल्याचे ते म्हणाले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ईटीच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. एका सूत्राने सांगितले की, विमान कंपनीने प्रवाशांना फ्लाइट रद्द करण्याबाबत माहिती दिली होती आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थाही केली होती. न्यूयॉर्क ते दिल्ली या फ्लाइटमध्ये काही प्रवाशांना जागाही देण्यात आली होती आणि उर्वरित प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.