कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती केली आहे.  दरम्यान, आयुक्त बलकवडे यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  महापालिकेतील विविध विभागांना सकाळी १०.३० वाजता अचानकपणे भेट देऊन उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.

यावेळी आयुक्तांनी अधिकारी व कर्मचारी उपस्थिती, विनामास्क कर्मचाऱी, उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली.  नागरी सुविधा केंद्र, पार्किंग, खासगी वाहनांना प्रवेश याबाबत संबंधितांना निर्देश दिले. यावेळी कार्यालयीन कामकाजात शिस्त,  स्वच्छता, टापटीप, पारदर्शकता आणि लोकाभिमुखतेला प्राधान्य दिले असून त्या अनुषंगाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना त्यांनी सूचनाही केल्या.

महापालिकेत खासगी वाहनांना प्रवेश बंदी

महापालिका आवारात  खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्याबरोबरच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनासाठी सिंगल पार्किंगसाठी पट्टे तत्काळ करण्याची सुचना आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिल्या. तसेच महापालिका इमारतीतील सुविधा केंद्रामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा  वापर,  सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी चौकोन तयार करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच पदाधिकारी तसेच पक्षकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अन्य विभागाकडे वसुलीसाठी तत्काळ वर्ग करण्याचे निर्देशही त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

निवेदन देताना केवळ ५ जणांना परवानगी

महापालिकेमध्ये येणारे मोर्चे तसेच आंदोलनकर्ते यांच्याकडून निवेदन देण्यासाठी महापालिकेत येताना केवळ पाच जणांना प्रवेश दिला जाईल. तसेच महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन,  ऑक्सिजन व टेम्प्रेचर तपासणी करण्याची सूचनाही आयुक्तांनी  संबंधित विभागाला केली.