मुंबई ( प्रतिनिधी ) : स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अवघ्या काही दिवसांतच लोकप्रिय झाली आणि सध्याच्या आघाडीच्या टीव्ही शोपैकी एक आहे. ही मालिका आणि यातील कलाकारांची प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे. आता तेजश्री प्रधानच्या जागी दुसरी अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तेजश्रीच्या या पोस्ट आणि त्याच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तेजश्री प्रधानची ही पोस्ट काहीशी खोचक असल्याचं दिसत आहे. तेजश्री प्रधानने इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं! तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा’.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही मुक्ताच्या भुमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. स्वरदाने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. आता स्वरदा ठिगळे तेजश्री प्रधानच्या जागी मुक्ताची भूमिका साकारणार आहे.