कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित असलेले 102 अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर येत्या 15 दिवसात उत्तरे द्या अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशही दिन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, नव्याने आलेल्या तसेच ऑनलाइन पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून कळवा. प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जांवर पंधरा निर्णय घ्यावे. प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास देवून त्यावर काम करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने 100 दिवसांचा गतिमान शासन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारी तसेच अर्ज वेळेत पाहून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांना अधिसूचित सेवा वेळेत देण्यासाठी मोहिम राबवून कामे करा असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
सोमवारी झालेल्या लोकशाही दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील एकुण 168 अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 45,जिल्हा परिषद 35, पोलीस प्रमुख 22, इतर विभाग 46 अशी संख्या होती. या लोकशाही दिनाच्या वेळी यापुर्वी दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या 102 अर्जांवरतीही आढावा घेण्यात आला.
या लोकशाही दिनादिवशी नव्याने 168 अर्ज दाखल झाले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ, उपायुक्त साधना पाटील यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.