शाहूवाडी/प्रतिनिधी : बांबवडे- कोकरूड मार्गावर सरूड नजीक जीप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात विनायक कोळवणकर या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सरुड येथील कडवी नदी जवळ दुपारी २.३० च्या दरम्यान होंडा शाईन (गाडी नंबर MH 09-DE 5174) वरून विनायक दत्तात्रय कोळवणकर व आरती कोळवणकर (रा.कोकरूड ता. शिराळा) हे बांबवडेहून कोकरूडच्या दिशेने जात होते. तर सरूडहून बांबवडेच्या दिशेने कमांडर जीप (MH10 C- 3668) घेऊन चालक मोहसीन बादशहा मणेर (रा. बांबवडे ता. शाहूवाडी) हा येत होता. दरम्यान सरुड येथील कडवी नदीच्या नजीक या दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली यात दुचाकी वरील विनायक कोळवणकर व आरती कोळवणकर हे गंभीर जखमी झाले होते.

यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून या दोघांना उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच विनायक कोळवणकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले असून अधिक तपास शाहूवाडी पोलीस करीत आहेत.