कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि. 11 जानेवारीपासून 6.5 फॅट आणि 9.0 एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर 2 रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दि. 10 जानेवारी रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये चर्चा होवून निर्णय घेण्‍यात आला आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच दूध उत्‍पादकांचे हित जोपासण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. संघाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हैस दूध उत्‍पादकांसाठी दिलासा देणारी दर वाढ केली आहे. दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय वाढण्यास आणि आर्थिक उन्नती साधण्याचा सहायक ठरेल असे मनोगत व्‍यक्‍त केले आणि गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार आणि हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्यावतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये 6.5 फॅट आणि 9.0 एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये 52.80 वरून रूपये 54.80 करण्यात आला आहे. तसेच 7.0 फॅट आणि 9.0 एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये 55.50 वरून रूपये 57.50 करण्यात आला आहे.

तसेच दि. 11 जानेवारीपासून सुधारित दरपत्रक लागू होईल. संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.