कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाभरामध्ये निर्माण झालेल्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर आणि बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली मागणी यामुळे गाय दुधाचा व्यवसाय खूप अडचणीत सापडला आहे. यातून दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिले गेले होते.
जून 2024 पर्यंतचे अनुदान गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यानंतरच्या अनुदानात रुपये 7 इतकी वाढ करण्याचा निर्णयही झाला, पण नंतरच्या अनुदानाची रक्कम अजूनही बहुतांश गाय दूध उत्पादकांना मिळालेली नाही. त्यातच मध्यंतरीच्या काळात गाय दूध खरेदीचा किमान आधारभूत दर शासनाकडून कमी करण्यात आला, त्यानुसार दूध संघाने गाय दुधाच्या प्रति लिटर खरेदी दरात घट केल्याने शेतकऱ्यांसमोर अजून एक मोठे संकट निर्माण झाले आहे.
एकीकडे पशुखाद्य आणि अन्य वैद्यकीय सेवा यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. दुसरीकडे खरेदी दर कमी आणि अनुदानाची रक्कम ही अजून जमा झाली नाही आहे. यामुळे गाय दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शेतीसमोर प्रमुख जोडधंदा म्हणून दूध उत्पादन या क्षेत्राकडे पाहिले जाते, पण दुर्दैवाने कोल्हापुरात येणारा सतत महापुर आणि अवकाळी पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना आता या प्रमुख दूध उत्पादनाच्या जोडधंद्यात सुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर काही निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम उर्वरित अनुदानाची रक्कम त्वरित गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. तसेच आणखी काही काळासाठी अनुदान पूर्ववत सुरू ठेवून व्यवसायाला उभारी द्यावी, शक्य असल्यास अनुदानाच्या रकमेची वाढ करावी आणि गाय दुधाचा किमान खरेदी दर रुपये 28 रुपये प्रति लिटर वरून 31 रुपये प्रति लिटर करण्यासंदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, असे निवेदन आ. अमल महाडिक यांनी दिले आहे.
यावेळी सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते.