मुंबई : बिग बॉसच्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणुन घराघरात ओळखली जाणारी अंकिता वालावलकर कायमच आपल्या रिल्स आणि व्लॉग्समुळे चर्चेत आलेली असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता परत एकदा चर्चेत आली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरने एका नव क्षेत्र निवडले आहे. याची माहिती तिने स्वतः दिली आहे. ‘झी मराठी’वर नवीन मालिका येत आहे तिने या मालिका साठी गाणे लिहिले आहे. तर या गाण्याची झलक अंकिताने तिच्या व्हिडीओच्या माध्यामातुन दाखवली आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर झळकली होती. या सीझनची अंतिम फेरी अंकितानं गाठली होती. बिग बॉसमुळे अंकिता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 23 डिसेंबरपासून ‘झी मराठी’ वर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं शीर्षक गीत अंकिताने लिहिले आहे. हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेसाठी अंकिताने शीर्षक गीत लिहिले आहे. या कौटुंबिक मालिकेची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. अंकिताच्या या पहिल्याच गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंकिता म्हणाली की “झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केलेली आहे.”