गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड, हरळी येथे सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वैधानिक लेखापरीक्षक सुशांत शरदचंद्र फडणीस यांनी केलेल्या अहवालानुसार, कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये 11 कोटी 42 लाख 64 हजार रुपयांचा अपहार झाला आहे आणि 18 कोटी 29 लाख 16 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अध्यक्ष डॉ प्रकाश श्रीपाद शहापूरकर, कार्यकारी संचालक, सचिव, मुख्य लेखापाल, तसेच कंत्राटदार यांच्यासह 24 व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
अपहाराचे प्रकार आणि रक्कम –
डिस्टलरी विस्तारामध्ये शासन परवानगीशिवाय 2 कोटी 38 लाख 76 हजार रुपयांचे अनियमित खर्च तर, मे. अल्कोटेक इंजि. बारामती यांना अॅडव्हान्स देऊन कोणतेही काम न करता रक्कम द्यायचा प्रकार झालेला असल्याची माहिती आहे. गिअरबॉक्स खरेदीमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून 2 कोटी 24 लाख 23 हजार रुपयांचे जुने गिअरबॉक्स खरेदी आणि फसवणूक करून रंगरंगोटी केलेल्या गिअरबॉक्सला नवीन म्हणून सादर केला आहे.
बॉयलर मॉडिफिकेशन मध्ये प्रशासकीय मंजुरीशिवाय 4 कोटी 46 लाख रुपयांची खरेदी आणि बॉयलर कामासाठी दिलेले पैसे आणि प्रत्यक्ष कामात विसंगती आहे. टर्बाइन खरेदीमध्ये जुन्या टर्बाइनची खरेदी आणि रिपेअरिंगसाठी 1 कोटी 35 लाख 31 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. कोणत्याही उत्पादनाशिवाय प्रचंड खर्च झाला आहे. तोडणी आणि वाहतूक अॅडव्हान्समध्ये 14 कंत्राटदारांना 98 लाख 21 हजार रुपये अदा आणि कंत्राटदारांकडून कोणतेही काम न करता मोठी रक्कम हडप करण्यात आली असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झालेल्यांची नावे –
गुन्हे दाखल झालेल्या मध्ये प्रशासकीय जबाबदार अधिकारी यामध्ये प्रकाश श्रीपाद शहापूरकर (अध्यक्ष), औदुंबर रेवणसिध्द तांबे (कार्यकारी संचालक),
सुधीर शामराव पाटील (कार्यकारी संचालक), महावीर सिध्दराम घोडके (कार्यकारी संचालक), मानसिंग अनंतराव देसाई (सचिव), बापूसाहेब रामचंद्र रेडेकर (मुख्य लेखापाल) यांची नावे आहेत. तर, तोडणी आणि वाहतूक कंत्राटदारामध्ये श्रीमंत बसाप्पा पुजारी, राजेंद्र नारायण देसाई, संतोष बंडु पाटील, अनिल श्रीकांत भोसले, शिवाजी ईश्वर शिंत्रे, सयाजी नारायण देसाई, बसवराज मल्लाप्पा आरबोळे, रुपाली किरण पाटील, महेश विलास ताडे, विलास पांडुरंग ताडे, यलुप्पा कुमाजा बोकडे, हणुमंत दादाराव तोंडे, दादाराव जोतिबा तोंडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 403, 405, 409, 415, आणि 463 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.