टोप (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोतिबा डोंगर ते सादळे – मादळे या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. मंगळवारी शिये (ता. करवीर) येथील डोंगर शेजारी असणाऱ्या धाकोबा मंदिर परिसरात रात्री ९ च्या सुमारास वस्तीवर आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवून एका शेळीचा पडशा पाडला.
बिबट्याने हल्ला करताच मेंढ्यानी आरडा ओरड सुरू केली. मेंढ्यांचा आवाज ऐकून मेंढपाळ सुरेश सिसाळ यांच्यासह धनगर समाजाच्या लोकांनी मेंढ्यांच्या कळपाकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून त्या शेळीला खाण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्याच्या निदर्शनास आले. मेंढपाळांचा आवाज ऐकताच बिबट्याने जबड्यात धरलेली शेळी तिथेच टाकून शेतवडीत पलायन केले.
या परिसरात बिबट्या आल्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती मेंढपाळ सुरेश सिसाळ यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी येऊन पाहणी केली.