टोप (प्रतिनिधी) : सादळे-मादळे येथे काल (शुक्रवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मादळे गावालगत प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस १४ ते १५ गव्यांचा कळप रस्त्याच्या अगदी जवळ रिकाम्या ठिकाणी फिरत असताना स्थानिकांना दिसून आला. गवे खाली उतारावरती फिरत असल्याने मादळे गावच्या मुख्य रस्त्यावरुन ते स्पष्ट पणे दिसून येत होते. ही बातमी अनेकांना समजल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी गव्यांना बघण्यासाठी गर्दी केली होती.

याआधी चारच्या सुमारास हा कळप पोवार मळा येथील जंगलात स्थानिक लोकांना दिसुन आला होता. तोच कळप पुढे जात कोरवी यांच्या बंगल्याच्या खालील बाजूला दिसून आला. या कळपात जवळपास दहा गवे पूर्णवाढ झालेले आणि लहान चार ते पाच पिल्ले असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. येथुन पुढे हा कळप मनपाडळे गावच्या दिशेने खाली निघून जाताना दिसून आला. हेच गवे गुरूवारी सायंकाळी कोपार्डे यांच्या शेतात शिरुन शाळवाचे पिक खात असताना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले होते.

हा गव्यांचा कळप पुन्हा शिवारात घुसून धुडगूस घालत असल्याने शेतकरी स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेत असून यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.