मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात लढत होत आहे. यालढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून त्यांच्यासह 25 जणांवर शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एपीएमसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, नवी मुंबई बाजार समिती शौचालय कथित घोटाळाप्रकरणी दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात माजी संचालक संजय पानसरे व एपीएमसीचे कर्मचारी शिवनाथ वाघ यांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या कथित घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाने शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने शौचालय कथित घोटाळ्यात शशिकांत शिंदेंवर तुर्तास कारवाई करणे शक्य होत नसल्यामुळेच एफएसआय वाटप घोटाळ्यात एपीएमसीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.

एपीएमसी मसाला मार्केटमधील ४६६ गाळेधारकांना २००९ मध्ये वाढीव एफएसआय देताना एपीएमसी प्रशासनाने ६५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच ठपका ठेवला आहे. या गाळेधारकांना वाढीव एफएसआयसाठी प्रतिचौरस फुटासाठी ६०० रुपयांचा दर तत्कालीन संचालक मंडळाने आकारला होता. त्यावेळचा रेडीरेकनरचा दर हा प्रतिचौरस फूट ३०६६ रुपये असताना ६०० रुपये आकारल्याने शासनाचे ६२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका आमदार शिंदेंसह बाजार समितीचे २४ संचालक व तत्कालीन सचिव सुधीर तुंगार अशा २५ जणांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४०६, ४०९ आणि ४२० अन्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची २००९ पासून चौकशी सुरू होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.