मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर रवी राजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारंसघातून रवी राजा आणि अमित शेट्टी यांना डावलून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा प्रचंड नाराज होते. याच नाराजीतून रवी राजा यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचे सांगितले जातं आहे.
रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांची मुंबईतील अनेक आंदोलने चर्चेचा विषय ठरली आहेत. ते मुंबईतील काँग्रेसचे सक्रिय आणि जमिनीवर उतरून काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राजा यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातं आहे.