गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांना समृद्ध करणाऱ्या कुंभी (लखमापूर) मध्यम प्रकल्पासह आणखी तीन लघु प्रकल्पांत पाठबंधारे विभागाच्या योग्य नियोजनामुळे फेब्रुवारीमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कुंभी धरणात सध्या ८३.९० टक्के म्हणजे २.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून उर्वरित प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
तर सर्वच धरणांत गतवर्षी जेवढा पाणीसाठा होता तितकाच यंदा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जून अखेर शेतीसह पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या भासणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या प्रकल्पामुळे गगनबावडा , पन्हाळा आणि करवीर असे मिळून ५४ गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो.
तर उन्हाळ्यात पाण्याची गळती टाळण्यासाठी कुंभी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे विभागाचे ८ आणि खासगी बंधारे २ बांधण्यात आले आहेत. तसेच कोदे लघु मध्यमप्रकल्पच्या अंतर्गत ५ गावांना पाणीपुरवठा होत असुन या बंधाऱ्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.