टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरातील क्रशर व्यावसायीकांवर गेल्या दोन दिवसापासून महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. ट्रेडींग लायसन्स आणि विविध कारणांवरून 45 क्रशर सील केल्या असून या कारवाईबाबत परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
परिसरात दगडखाणी आणि क्रशर व्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो. यामध्ये शेकडो वाहने, मजूर कार्यरत असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. या परिसरातून तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातील खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पासाठी गौनखनिजासह विविध प्रकारचे बांधकाम साहित्य पुरविले जाते. मात्र, या कारवाईमुळे आता कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
गौण खनिज उत्खननासाठीची रॉयल्टी,ट्रेडींग लायसेन् सह विविध प्रकारच्या परवानग्या नसल्याचे कारण देत हा कारवाईचा बडगा उगारला असून या मुळे क्रशरची धडधड आणि वाहनांची चाके थांबणार आहेत. याबाबत हातकणंगल्याचे नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी, महसूल विभागाने ही कारवाई सर्वत्र सुरू केली असून जे व्यावसायिक ट्रेडींग लायसेन्स घेतील ते क्रशर सुरू करण्यास परवानगी देणार आहे. तर रॉयल्टी चुकविणाऱ्यांना चाप लावणे हा देखील कारवाईचा उद्देश असल्याचे सांगितले.
ही कारवाई हातकणंगलेचे नायब तहसीलदार संजय पुजारी,महसूल सहायक निलेश सकपाळ,शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये,टोप तलाठी सुनिल बाजारी, शिरोलीचे तलाठी महेश सुर्यवंशी, शिरोली, टोप येथील कोतवालांनी केली.