देवगड(प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे 41 हजार 250 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण 54 मीमी पाऊस पडला असून आतापर्यंत तालुक्यात 2356 इतके पाऊस झाल्याची नोंद आहे.तालुक्यात विजेचा सतत लपंडाव होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.किनारपट्टी भागात सुमारे 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 41 हजार 250 इतके नुकसान झाले आहे.यामध्ये विठ्ठलादेवी येथील विठ्ठलादेवी मंदिर देवस्थानची कमान कोसळून सुमारे 15 हजार,कालवी येथील बबन धुरी यांच्या भात पिठाच्या गिरणीवर झाडाची फांदी पडून 15 हजार 350 रुपये, वानिवडे येथील प्रकाश विश्राम भारती यांच्या गोठ्यावर झाड पडून 4 हजार 200 रुपये,तर हिंदळे येथील विजय बाळकृष्ण मयेकर यांच्या घराच्या छप्परावर रतांबीचे झाड पडून सुमारे 6 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले आहे.असे मिळून तालुक्यात 41 हजार 250 रुपये नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील येथे करण्यात आली आहे.

किनारपट्टी भागात साधारण 40 ते 50 किमी पेक्षा जास्त वेगाने वाहणारे वादळीवारे,अतिवृष्टीमुळे आणि विजेचा होणारा लपंडाव यामुळे जनता त्रस्त झाली आहे.शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेलाचं आहे.