वारणा (प्रतिनिधी) : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम 2024-2025 मध्ये गळीताला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3,220 रुपये प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय आज कारखान्याचे चेअरमन आणि आमदार विनय कोरे यांनी घेतला. तसेच सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 30 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखान्याच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचेही आ. कोरे यांनी सांगितले.

आ. कोरे म्हणाले की, गळीत हंगाम 2024-2025 मध्ये मार्च महिन्यात येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३,४०० रुपये दर देणार आहे. तसेच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे बुलेट आणि स्प्लेंडर मोटरसायकलच्या लकी ड्रॉची प्रोत्साहनपर बक्षीस योजना याहीवर्षी चालू राहणार आहे. तसेच सर्व सभासद, ऊस उत्पादकांची दिवाळीही गोड करणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना नेहमीच चांगला ऊस दर दिला आहे. तर शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबविलेल्या आहेत. यावर्षीचा ६६ वा गळीत हंगाम सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या सहकार्यातून १७ डिसेंबर रोजी सुरु होवून या हंगामात कारखान्याने आजअखेर एकूण 2,46.915 मे.टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आणि गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस गळीताला पाठवून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार विनय कोरे यांच्यासह संचालक मंडळाने आभार मानले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक सदस्य, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत, सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.