कोल्हापूर (प्रतिनिधी) : रामानंद नगर येथील जाधव पार्कमधील बंद बंगला फोडून चोरट्यानी २५ हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी सुधर्म संजय देसाई यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असून याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रामानंद नगर येथील जाधव पार्क मधील चौथ्या गल्लीमध्ये सुधर्म संजय देसाई हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. ११ सप्टेंबर पासून ते कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील कपाट फोडून त्यातील २५ हजारांची रोकड लांबवली. आज (बुधवार) सकाळी यांच्या देसाई यांचा बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले.

याबाबतची माहिती त्यांनी देसाई यांना फोनवरून कळवली. त्यानंतर सायंकाळी सुधर्म देसाई रामानंद नगर येथे परत येऊन त्यांनी याबाबतची माहिती करवीर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.