मुंबई : राज्यात गेल्या दोन तीन दिवसात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या दुर्घटनामध्ये एक दोन नाही तर तब्बल 20 जणांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे मृत्यू ही बुडून झाले आहेत. सोलापूर, इंदापूर, नाशिक अहमदनगर इथं या दुर्घटना घडल्या आहेत. यात नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा तर इंदापूर इथे एकाच कुटुंबातल्या चार जणांचा समावेश आहे. यात लहानमुलांचाही समावेश आहे. तर आज प्रवरा नदीत बोट उलटून SDRF च्या जवानांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, सोलापुरात एक तर अहमदनगरमध्ये एक अशा या चार ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील उजनी जलाशयात एकूण सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील सहाही लोकांचे मृतदेह तब्बल 20 तासांनंतर सापडले आहेत. राज्यात घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इगतपुरीत मायलेकी बुडाल्या…
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे विहिरीत बुडून माय लेकीचा मृत्यू झाला. तालुक्यातील मुंढे गावाजवळील शेनवड खुर्द गावामध्ये ही घटना घडली. 23 वर्षीय महिला प्रियंका दराणे शेतात काम करत होती. तीन वर्षीय मुलगी विहिरीजवळ गेल्यानंतर पाण्यात पडली. त्यावेळी मुलीला वाचवण्यासाठी महिलेने विहिरीत उडी घेतली. पण विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने हा दुर्दैवी अपघात झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

भावली धरणात एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू…
नाशिक जिल्ह्यातील भावली धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोसावी वाडीतील हनिप शेख कुटुंबावर हा प्रसंग ओढावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाशकातील उकाड्याने त्रस्त झालेल्या शेख कुटुंबातील मुलांनी मामाकडे पोहोचण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मामा आणि भाची मंडळी असे नऊ जण पोहोण्यासाठी इगतपुरीच्या भावली धरणावर पोहोचली. यावेळी दोघेजण खोल पाण्यात गेले असता, त्यातील एकाचा पाय खाली अडकला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी अन्य तिघांनी पाण्याती उडी मारली. मात्र, तेही बुडाले. ज्यामध्ये मामा, दोन मुली, दोन मुले अशा पाच जणांचा समावेश होता.

उजनी जलाशयात सहा जणांचा मृत्यू…
करमाळा ते इंदापूर असे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागते. पण हा वेळ वाचावा यासाठी बऱ्याचदा लोक उजनी धरणातून प्रवास करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशातच मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास उजनी जलाशयातून अवैधरित्या प्रवास करणारी प्रवाशांची बोट उलटल्याने अपघात झाला. या घटनेत तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफच्या टीमला तब्बल 40 तासांनंतर सहाही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मंगळवारी उजनी जलाशयातून काही लोकांचा बोटीतून प्रवास सुरू असताना जोरदार वारा सुटला. या जोरदार वाऱ्यामुळे जलाशयातच बोट उलटली आणि अपघात घडला. या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. कोमल गोकूळ जाधव (वय वर्ष 25), शुभम गोकूळ जाधव (वय वर्ष दीड), माही गोकूळ जाधव (वय वर्ष 3) यांचा समावेश होता. हे सर्व करमाळा तालुक्यातील झरे गावचे रहिवासी आहेत.

प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली…
वाढत्या उकाड्याला त्रासून बुधवारी (ता. 22 मे) अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव मधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सागर पोपट जेडगुले (वय वर्ष 25) आणि अर्जून रामदास जेडगुले (वय वर्ष 18) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. प्रवरा नदीत पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि यामध्ये या दोघांना आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे.

तर, या घटनेतील सागर जेडगुले याचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पण. आज गुरुवारी (ता. 23 मे) सकाळी अर्जून जेडगुले याचा शोध घेण्यासाठी SDRF ची टीम गेली असता नदीतील भवऱ्यात अडकून बोट उलटली. ज्यामध्ये पाच एसडीआरएफच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेत दोन तरुण आणि पाच एसडीआरएफचे जवान अशा जणांचा मृत्यू झाला आहे.