कळे (प्रतिनिधी) : सन 2024 मध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर आणि अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.पन्हाळा तालुक्यातील 16 हजार शेतकरी बाधित झाले होते. त्यांना 13 कोटी 32 हजार रुपये मदत देणे आवश्यक असून ११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानीबाबत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता.यामध्ये पन्हाळा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची गाव निहाय यादी अपलोड करण्याचे काम झाले आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई जमा होणार होती. मात्र, या प्रक्रियेस एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात नाराजी पसरली आहे.