मुंबई – एकीकडे सध्या देशात विधानसभा निवडणुकीचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरु आहे. महायुतीने सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. अशातच या योजनेसंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी महायुतीवर टीकास्त्र डांगले आहे आता माजी कृषी मंत्री शरद पवारांनी या योजनसंदर्भात महायुतीसरकारला धारेवर धरले आहे.

काय म्हणाले शरद पवार..?

धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. जेसीबीवरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी शरद पवार म्हणाले, आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या 20 वर्षांत काहीच विकास झाला नाही. हे सरकार बहिणींना 1500 हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर शरद पवार यांनी केला.

पुढे पवार म्हणाले, सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.आता यावर महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.