कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने इचलकरंजीसह परिसरातील औद्योगिक पाण्याच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सेंट्रल एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) प्रकल्पासाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, झिरो डिस्चार्ज (ZLD) तंत्रज्ञानामुळे सर्व औद्योगिक पाणी पुन्हा वापरात आणता येणार आहे.
या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे पाणी शुद्ध केले जाईल आणि यड्राव सह परिसरातील गावांना प्रदूषणाच्या संकटातून कायमची सुटका मिळणार आहे. हा झिरो डिस्चार्ज तंत्रज्ञान असलेला प्रकल्प असल्यामुळे पाणी बाहेर न जाता पूर्णतः प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. यामुळे पार्वती इंडस्ट्री इस्टेटमधील कारखाने प्रदूषणमुक्त पद्धतीने चालवता येणार आहेत. या योजना मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या सीईटीपी प्रकल्पाबरोबरच, सरकारने इचलकरंजी परिसरातील आणखी दोन औद्योगिक पाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उन्नतीकरण आणि क्षमता वाढीसाठी निधी मंजूर केला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 609 कोटी 58 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे इचलकरंजी आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात होणारे पाण्याचे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
ही योजना केवळ औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी नाही तर स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठीही महत्त्वाची आहे. औद्योगिक क्षेत्रातील पाणीप्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून घेतलेला हा निर्णय खूपच स्वागतार्ह आह