बानगेतील राजवर्धनला राष्ट्रीय कुस्तीत ब्राँझ पदक..!
मुरगूड ( प्रतिनिधी ) : बानगे गावची कुस्ती पंढरी म्हणून ओळखनिर्माण करण्यात मोलाचा वाटा असणार्या उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या एकुलत्या असणाऱ्या राजवर्धननेही राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत डंका वाजविला आहे. उत्तरप्रदेश (गोरखपूर) येथे १ ते ४ डिसेंबर या कालावधीत झालेल्या १७ वर्षांखालील शालेय कुस्ती स्पर्धेत ९२ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने चटकदार कुस्त्या करत ब्राँझ पदक पटकाविले आहे. राजवर्धनच्या यशाने बानगेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या हस्ते पदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल बानगेवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी करत राजवर्धनचे उस्फुर्त स्वागत केले. आक्रमकपणे खेळणाऱ्या राजवर्धनने पाच कुस्त्या केल्या. यामध्ये उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा येथील मल्लांना पराभूत केले. तर अंतिम कुस्तीत त्याने हरियाणाच्या मनाला सात एक गुणांनी पराभूत करून आपल्या पदकावर नाव कोरले. राजवर्धन हा बानगे येथील जयभवानी तालमीत सराव करत असून बिद्री येथील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत आहे. त्यांना उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, भाऊसाहेब सावंत, एन आय एस कोच आकाश नलवडे, वैभव तेली यांचे मार्गदर्शन तसेच बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, प्राचार्य, सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.
अधिवेशनातील सर्वच प्रश्नांना सरकार खंबीरपणे उत्तर देईल : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षभरात प्रचंड विकास तर केलेलाच आहे. तसेच; जनतेला दिलासा देण्यात सरकार यशस्वी ठरलेले आहे, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. अतिवृष्टी, दुष्काळ आणि महापूर यामुळे संकटग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडून ४० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यापैकी ५० टक्क्याहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत पोहोचलेली आहे. लाडकी बहीण योजना सुरळीत करण्यात सरकारला यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या योजनेवर ४३ हजार कोटी खर्च केले आहेत. इतका मोठा आर्थिक ताण सोसूनही सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात एक दिवसही वेळ केलेला नाही, असेही ते म्हणाले. मंत्री मुश्रीफ कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बोलत होते. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मुंबईसह एमएमआरडी आणि सबंध महाराष्ट्रभर मूलभूत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. मुंबईत कोस्टल रोड, अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. तसेच; वाढवण बंदराचा शुभारंभही झालेला आहे. ते पुढे म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचेही वचन पूर्ण करू. नगरपरिषदांच्या लांबलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता मुश्रीफ म्हणाले, ईव्हीएम मशीनची सुरक्षा सांभाळणे आणि ईव्हीएम बाबतच्या शंका- कुशंका थांबायच्या असतील तर ताबडतोब निकाल होणे अपेक्षित होते. आज- उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत हा मुद्दा निकाली व्हावा, अशी अपेक्षा आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शितल तेजवानी यांना अटक केली आहे. त्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 ची रुपरेषा जाहीर..!
कुणकेश्वर ( प्रतिनिधी ) : शतकानुशतके जोपासली गेलेली आध्यात्मिक परंपरा उजळून मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 चे औपचारिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान भक्तीमय वारी, वयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग आणि सेवक भेटींच्या धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. उत्सव समितीने संपूर्ण कार्यक्रमपत्रिका जाहीर केली असून यंदाची वारी अधिक भव्यतेने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. १३ डिसेंबर – पहाटे ६.३० वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात गावघर १२/५ देव सेवकांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल. सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर मंदिरातून प्रस्थान होऊन कुलस्वामी मंदिर जोगलवाडी, देऊळवाडी भवांडा, पडळी, गोलतकर ब्राह्मणस्थळ अशा पारंपरिक स्थळी भेटी घेतल्या जातील.दुपारी १ वाजता उत्कटवाडी गणेश मंदिरात भोजनानंतर सायंकाळी फाटक मंदिर भेट, चौगुले सेवक भेट, खाडिलकर महाजन भेट असे कार्यक्रम होतील.रात्री ९ वाजता सुभेदार सेवक भेट व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री ११ वाजता झाडाखाली स्थिर होऊन विश्रांती व मुक्काम असेल. १४ डिसेंबर – डाळपस्वारीचा दुसरा दिवस या दिवशीही वैयक्तिक न्याय (मेळे) होतील. सकाळी ८ वाजता प्रस्थानानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिर, डाळप खळ्यावर भेट (भंगसाळ), म्हसेश्वर (खुरणी) .तांबळडेग विठ्ठल रुखुमाई मंदिर भेट,तांबळडेग संपूर्ण गाव रयतेतर्फे विठ्ठल रखुमाई मंदिरात भोजन व्यवस्था असेल.यानंतर दक्षिणवाडा, उत्तरवाडा, वेताळ खुरणी, डगरेवाडी कुलस्वामी मंदिरात भेट रात्री डगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कुलस्वामिनी मंदिरात भोजन होऊन देवतरंग गजबादेवी मंदिरात स्थिर होऊन मुक्काम असेल. १५ डिसेंबर रोजी एकादशी असल्याने या दिवशी सर्व तरंग–साज गजबादेवी मंदिरातच थांबणार आहेत. गावघरातील वयक्तिक न्याय सकाळी १० वाजता सुरू होतील. १६ डिसेंबर – डाळपस्वारीचा चौथा दिवस यादिवशी मेळे वैयक्तिक न्याय मेळे होणार नसून सकाळी ६.३० वाजता गजबादेवी मंदिरातून प्रस्थान होईल.कातवण स्मशानातील खुरणी, खोत सेवक भेट, कातवणकर सेवक भेट, महापुरुष कातवण भेटी झाल्यानंतर गावहोळी येथे भेट ,केळया येथे खुरणी झाल्यावर श्री निलराज लोके यांच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.दुपारी गोगटेतळे भेट, मिठबाव वेस भेट विधी, सोमण (उपाध्या) व काळे महाजन भेट, बाराचा पूर्वस सुतारवाडी भेट आणि पुढे देवी काळंबादेवी भेट होईल.रात्री देवी सातेरी येथे मुक्काम
खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली ‘हि’ मागणी
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अशा दोन मुद्दयांना वाचा फोडली. दोन्ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, त्यातून कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी नमुद केले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज राज्यसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित केले. कोल्हापूर तेˆमिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापूरˆवैभववाडी मार्ग, याबाबत मंजूरी मिळाली आहे. सध्या कोल्हापूरˆमिरज हा ५० किलोमीटरचा एकेरी रेल्वे मार्ग असून, त्यामुळे नवीन गाड्या सुरू करणे शक्य होत नाही. पुणे ते बेंगलोर या अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले, तरी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे. त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासाला अडथळा येत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. तसेच कोल्हापूर तेˆवैभववाडी या रेल्वे मार्गाला, सन २०१७ च्या रेल्वे अंदाजपत्रकात ३५० कोटींची तरतुद झाली. या मंजूर प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाईल. तसेच देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांना रेल्वेमार्गानं जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असे त्यांनी नमुद केले. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प गतीमान पध्दतीने पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा महाडिक यांनी सभागृहात बोलून दाखवली.
गडहिंग्लज येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार..!
गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयाजवळ महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादनाचा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पक्षाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या हस्ते हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सचिन घुगरे यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनाच्या पावन स्मृतिदिनी संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे अहिंसा, सत्य आणि मानवधर्माचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांचीही आठवण करून देण्यात आली. या कार्यक्रमावेळी अनिल खोत, आप्पा शिवणे, दशरथ कांबळे, संतोष पेडणेकर, संदीप कुरळे, कुमार पाटील, चंद्रकांत मेवेकर, प्रल्हाद पाटील, प्रवीण चव्हाण, प्रा. R. B. पाटील सर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा वारसा जपत समाज बांधणीचे कार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
मोरेवाडी येथे दत्तजयंती उत्साहात साजरी..!
कळे ( प्रतिनिधी ) : मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथील दत्त मंदिरात प.पु.योगी प्रभूनाथ महाराज यांच्या आर्शिवादाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात श्री दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या पारायणाची गुरुवारी सकाळी सांगता झाली. पारायण दरम्यान दररोज काकड आरती, पूजा, ग्रंथ वाचन, प्रसाद, सायंकाळी प्रवचन, भजन, किर्तन, पालखी नगर प्रदिक्षणा होत होती. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे काकड आरती, मूर्तीला षोडशोपचार पूजा, पंचामृत, अभिषेक व महाआरती करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी महिलांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात 'श्री' चा जन्मकाळ सोहळा झाला. पाळणा विविध रंगाच्या फुलांनी सजवला होता. भाविकांनी अबीर, गुलाल व फुलांची उधळण केली. जन्मकाळानंतर पारंपरिक पाळणा गीते, आरती व प्रार्थना करण्यात आली. सुठंवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. ९वाजता. धूपदीप आरती, नगर प्रदिक्षणा पालखी सोहळा व भजन, किर्तन संपन्न झाले. सोहळ्यास भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शुक्रवार ता.५ रोजी. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थांनी केले होते.
ट्रेंडिंग बातम्या
आणखी विषय :
कोरोनाचे मुंबईत 56 रूग्ण : तर पुण्यात वृद्धाला लागण
