अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यात मविआचं ठरलं असून डॉ. अभय पाटील हेचं अकोल्यात उमेदवार असणार आहेत. येत्या ४ एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे नामाकांन अर्ज दाखल करणार आहेत. अकोल्यातील मविआच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून यामुळे प्रकाश आंबेडकर यांची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्यात वंचितनं काँग्रेसला २ ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.पण आता अभय पाटील यांच्या उमेदवारीने या चर्चेंवर पूर्णविराम मिळाला आहे. अकोल्यात डॉ. अभय पाटील हेचं उमेदवार असणार, असं तिन्ही पक्ष प्रमुखांचं म्हणंण आहे. प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा आणि मविआसोबत यावं, अशी इच्छा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली आहे. अभय पाटील यांच्या उमेदवारीने प्रकाश आंबेडकर यांचा मार्ग खडतर बनला आहे.
यावेळी या बैठकीत प्रचार आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. त्यासाठी आजच्या बैठकीला महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट, तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते हे उपस्थित होते. दरम्यान, अकोल्यात लोकसभेसाठी वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून अनुप धोत्रे हे निवडणूक लढ़वणार, असं चित्र स्पष्ट झालं. मात्र, तोपर्यंत कोण मैदान मारून नेण्यासाठी स्वत:ला तयार करणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावेळी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर या बैठकीला उपस्थित होते.