News Flash

उच्चदाबाच्या वाहिनीचा मार्ग बदलण्यासाठी बिद्री येथे महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ

बिद्री (प्रतिनिधी) : बिद्री (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेवरून जाणारी ३३ के. व्ही. उच्च दाबाची धोकादायक विद्युत वाहिनी अन्य मार्गाने न्यावी या मागणीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने आज ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी महवितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेराओ घातला. तर तीन वर्षांपूर्वी वाहिनीच्या धक्क्याने हात निकामी झालेल्या मुलाच्या कुटूंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

सोनाळी येथील नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या पंप हाऊसला वीजपुरवठा करण्यासाठी बिद्री येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून ३३ के. व्ही. उच्च दाबाची वाहिनी गेली आहे.  या  तारा लोंबकळत आहेत. या वाहिनीमुळे दोन ते तीन वेळा अपघात घडले आहेत. ११ मार्च २०१५ ला या वाहिनीचा धक्का बसून शिवप्रसाद रणजीत पाटील याचा उजवा हात निकामी झाला आहे. आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर १५ ते १६ लाख खर्च झाले आहेत. त्यामुळे या वाहिनीचा मार्ग बदलावा अशा मागणीची निवेदने वारंवार दिली आहेत. पण याबाबत कुणीच दाद दिली नाही. गुरुवारी या वाहिनीचे विद्युत खांबावर शॉर्टसर्कीट होऊन ठिणग्या पडल्या होत्या.  सुदैवाने विद्युत पुरवठा खंडीत झाला. मात्र संतप्त नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी सोनाळी येथील पाणीपुरवठा संस्थेच्या पंप हाउसला टाळे ठोकले. या संस्थेचे अध्यक्ष सत्यजीत पाटील यांनी विद्युत वाहिनीमुळे नागरिकांना धोका पोहचत असल्यास वीज बंद राहण्यास हरकत नसल्याची भूमिका घेतली.

आज बिद्री ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी मुरगूड विभाग महावितरणचे अधिकारी बी. बी. मोळे व एस. पी. चौगले यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेराओ घातला. जोपर्यंत विद्युत वाहिनीचा मार्ग बदलला जात नाही तोपर्यंत वीज वाहिनी चालू करू दिली जाणार नाही, असा इशारा दिला. या वेळी रणजीत पाटील यांनी त्वरित वाहिनी न बदलल्यास वीज वितरण कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन  करण्याचा हशारा दिला.   मोळे यांनी ही वाहिनी बदलण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या वेळी सहाय्यक अभियंता अमित कुदळे उपस्थित होते.

आंदोलनात पांडुरंग पाटील, भिकाजी पाटील, साजन पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, नंदू पाटील यांचेसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!