News Flash

राहुल गांधी-शेट्टी यांच्या भेटीने ‘हातकणंगले’तील राजकीय समीकरणे बदलणार ?

कोल्हापूर (संदीप बिडकर) :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा हातकणंगले मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे. राजू शेट्टी यांनी युपीएमध्ये जाणार नाही असे जरी स्पष्ट केले असले तरी. राजकारणामध्ये काहीही घडू शकते. काँग्रेस व राजू शेट्टी यांनी भाजपालाच प्रमुख शत्रू मानले असल्याने भविष्यात काहीही घडू शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

       गत लोकसभा निवडणुकीमध्ये खा. राजू शेट्टी हे एनडीएमधून भाजप-शिवसेनेच्या आधाराने निवडणूक लढवून जिंकून आले होते. सध्या खा. राजू शेट्टी यांनी एनडीएपासून फारकत घेऊन भाजपच्या केंद्रातील व राज्यातील सरकारला लक्ष्य केले आहे.  त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ते एनडीएचे उमेदवार निश्चितच नसणार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास आता काँग्रेस व राष्ट्रवादीला पुरक ठरत आहे. याचा परिणाम म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन समीकरणे जुळण्यास प्रारंभ झाला आहे.

          खा. राजू शेट्टी हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीकडून निवडणूक लढविण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत आहे. तसे झाले तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पहावयास मिळेल. कारण गत लोकसभा निवडणूक लढविलेले माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांना खा.राजू शेट्टी यांचा प्रचार करावा लागणार आहे. तसेच सध्यातरी भाजप-शिवसेनेकडे खा. राजू शेट्टी यांना टक्कर देऊ शकणारा एकही उमेदवार दिसत नाही. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याही नावाची चर्चा हातकणंगले मतदारसंघातून होत आहे. माजी खासदारपुत्र धैर्यशील माने यांनीही काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच केले आहे. पण ते कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार हे अद्यापही स्पष्ट केले नाही.

एकंदरीत खासदार राजू शेट्टी यांच्या राहूलभेटीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले आहे. याबाबत राजू शेट्टी कोणता निर्णय घेणार  आणि आवाडे काय भूमिका घेणार, हे अद्याप  गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!