News Flash

राधानगरी-भुदरगड मतदारसंघात उमेदवारीवरून ‘सख्खे नातेवाईक पक्के प्रतिस्पर्धी..?’

राशिवडे (बजरंग मोरे) : आगामी २०१९ साली होणारी विधानसभा निवणूक लढवायचीच अशी पक्की खूणगाठ मनाशी बांधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. परिणामी  सख्ख्या नातेवाईकांतच राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून मोठी दरी निर्माण झाली आहे. मात्र या राजकीय साठमारीत कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचे चित्र आहे.

        गत निवडणुकीत के. पी. पाटील यांना राधानगरी तालुक्यातून मोठे मताधिक्य दिले होते. त्यामुळे के.पी.पाटील यांची हॅट्ट्रिक होणार असे वाटत होते. मात्र प्रकाश आबिटकर यांनी पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. माजी आमदार के.पी.पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील हे मेहुणे पाहुणे आहेत.तर भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील हे के.पी.पाटील यांचे जावई आहेत. भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना ए. वाय. पाटील यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे नूतन संचालक मंडळात काही ए. वाय. पाटील यांना मानणारे तर काही संचालक धैर्यशील पाटील यांना मानणारे होते. यातूनच या दोघांमध्ये राजकीय दरी निर्माण झाली. त्यामुळेच भोगावतीच्या निवडणुकीत ए.वाय.पाटील व त्यांचे कार्यकर्ते चार हात दूरच राहिले. परिणामी धैर्यशील पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला. त्या पराभवाचे पडसाद सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मिडियावर उमटू लागले आहेत.

       कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी ए.वाय.पाटील यांनी आवळी बु।। येथे तर धैर्यशील पाटील यांनी आमजाई व्हरवडे येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. यातून थेट दोघांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला चक्क के.पी.पाटील यांचे जावई धैर्यशील पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी करीत सर्वांना धक्का दिला आहे. त्यामुळे राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून नात्यातच वाद उफाळून आला असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

ए.वाय.पाटील, के.पी.पाटील, धैर्यशील पाटील यांच्यात राधानगरी मतदारसंघातील उमेदवारीवरून निर्माण झालेली राजकीय दरी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे तालुकाध्यक्षांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!