News Flash

दहावीचे पेपर तपासणार नाही : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा पवित्रा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विनाअनुदानित शिक्षक गेली अठरा वर्षे अत्यल्प वेतनावर तर बऱ्याच ठिकाणी विनावेतन काम करत असून आतापर्यंत जवळपास २१० आंदोलने केली आहेत. तरीही शासनाने या शिक्षकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या शिक्षकांची  आठवण फक्त दहावी बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी होते. परंतु त्यांना अनुदान देतेवेळी सरकार झोपी जाते, असा आरोप करीत दहावीच्या परीक्षेचे पेपर तपासणार नाही, असा पवित्रा आज (सोमवार) विनाअनुदानित शिक्षकांनी घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आंदोलन करीत तपासणीसाठी दिलेले पेपर बोर्डाला परत केले.

कृती समितीने केलेल्या विविध आंदोलनामुळे काही शाळांचे मूल्यांकन झाले या वेळी पात्र-अपात्रच्या निर्णयावेळी अनेक शाळा मूल्यांकनात अपात्र केल्या. राज्यात फक्त १२३ शाळा व २३ शाळांच्या वाढीव तुकडया अशा फक्त १४६ शाळाच अनुदानासाठी पात्र घोषित केल्या तर इतर सर्व शाळा अपात्र केल्या. त्यामुळे या शिक्षकांनी बोर्ड परिक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला.

याची पूर्वसूचना म्हणून कार्यालयासमोर उत्तर पत्रिकांची प्रतीकात्मक होळी केली. दररोज होणाऱ्या दहावीच्या परिक्षेचे पेपर असेच बोर्डाला जमा करण्याचे नियोजन शिक्षकांच्याकडून करण्यात आले आहे. शिक्षकांमध्ये आलेल्या नैराश्येतून कोणतेही गैरकृत्य घडल्यास याला सर्वस्वी बोर्ड व शासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षक रत्नाकर माळी, बाजीराव बरगे, रामचंद्र खुडे, पूजा शिंत्रे, पल्लवी कांबळे आदीसह शिक्षक सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!