News Flash

एकाचवेळी ११ वाचनालयं सुरु करण्याच्या ‘भागीरथी’च्या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, याकरिता भागीरथी महिला संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी ११ ठिकाणी वाचनालय सुरु करण्याचा उपक्रम राबवला. राज्यात यापूर्वी असा उपक्रम कुठेच झालेला नाही. त्यामुळेच त्याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे, अशी माहिती संचालक सुनील पाटील यांनी दिली. या विक्रमाबाबतचं प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह पाटील यांनी संस्थेला प्रदान केले.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली आहे. १ मे रोजी वर्षातून एकदा या पुस्तकाचे प्रकाशन होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या वतीने जिल्हयात एकाच वेळी ११ ठिकाणी वाचनालये सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ, शाहू स्मारक भवनमध्ये झाला. सुनील पाटील यांनी सांगितले की,  आजवर आपण ३ हजाराहून अधिक कवितांचा संग्रह, पुस्तकांवर मूळ लेखकाची स्वाक्षरी याद्वारे आपल्यापरीने साहित्य सेवा केली आहे. संस्था अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा विस्तार होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर विक्रम नोंद झाल्याचे प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह पाटील यांनी सौ. अरूंधती महाडिक यांना प्रदान केले. वाचनालयासाठी पाटील यांनी काही पुस्तके प्रदान केली.

यावेळी सोनाली नवांगूळ, प्रभा भागवत, माजी महापौर सई खराडे, मनिषा जाधव, जिग्ना वसा, अवनी शेठ, तेजस्वीनी घोरपडे, सविता शिंदे, डॉ. प्रिया दंडगे, सुवर्णा गांधी, नगरसेविका आणि सदस्या, विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी आणि भागीरथी संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!