News Flash

कागल पालिका सभेत महापुरुषांच्या पुतळा उभारणीसह ३७ विषय मंजूर

कागल (प्रतिनिधी) : गैबी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, त्याच ठिकाणी म. फुले यांचा पुतळा तर बापूसाहेब महाराज चौकात आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणे, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका करणे तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे आदी ३७ विषयांवर चर्चा होऊन सभागृहाने मान्यता दिली.

नगरपालिकेच्या शाहू वाचन मंदिरात झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या. प्रभारी मुख्याधिकारी सोनुले यांची प्रमुख उपस्थिती होती. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगता सभा शांततेत पार पडली. भाजपाचे विशाल पाटील यांनी शहरात अद्यापही लाभांपासून वंचित असणाऱ्या अपंगांची संख्या अधिक आहे. याकामी नाव नोंदणी करून घेतली जात नाही. विभाग प्रमुखांबद्दल तक्रारी असल्याने सर्वांना लाभ मिळावा, असे स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणासाठी व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, महिलांच्या आरोग्य प्रबोधनाबाबत वंदना गुप्ते यांचे व्याख्यान व महिलांसाठी करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा नगराध्यक्षा सौ. माळी यांनी केली. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाहू वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका व स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी करण्यास सभागृहाने मान्यता दिली. उपनगराध्यक्ष प्रविण काबर यांनी ही सूचना मांडली.

रि. स. नं. १९३५ पैकी आ. क्र. ३४ मधील जागा धनगर समाज यांच्या नावे होण्यासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव देणेकामी समाजाला ना हरकत दाखला देणेचा निर्णय झाला. याशिवाय वृक्षलागवड राबविणेकामी सामाजिक वनीकरण विभागास पालिकेच्या पाणलोट क्षेत्रातील जमीन देणे, पालिकेच्या नवीन इमारतीचे, शॉपिंग सेंटर व इमारतीचे फायर ऑडिट व फायर प्रूफ यंत्रणा निर्माण करणे, २०१५ किंवा तत्पूर्वीची पालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत बांधकामे नियमित करणे, जयसिंगराव तलावाच्या बंधाऱ्यास पडलेल्या भेगेची दुरुस्ती करणे व बंधाऱ्यावर सुशोभिकरण करणे, ·वाडी येथील झोपडपट्टी व घरकुल येथे गटर, रस्ते, विद्युत पोल व संरक्षक भिंत करणे आदींसह ३७ विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.

सभेतील चर्चेत सौरभ पाटील, विवेक लोटे, नूतन गाडेकर, सतीश घाडगे, चंद्रकांत गवळी, आनंदी मोकाशी, विजया निंबाकर, मंगल गुरव, सुरेखा पाटील यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!