News Flash

कोणतेही प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीशिवाय जिल्हा परिषदेकडे न पाठवण्याचा कागल पं. स. सभेत ठराव

कागल (प्रतिनिधी) : कागल आणि मुरगूड येथील ग्रामीण रूग्णालयाने आपली कामकाजाची आरोग्यविषयक उद्दीष्टे पूर्ण केली आहेत. तथापी तालुका आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उपाययोजनेबाबतची उदासिनता, पशुसंवर्धन विभागातील शासकीय योजनांच्या लाभाबाबतची माहिती सदस्यांना मिळत नाही. याबाबत शनिवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांकडून नाराजी व्यक्त करून येथून पुढे पंचायत समितीचे कोणतेही प्रस्ताव सभागृहाची मंजुरी घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येवू नयेत, असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला.
येथील पंचायत समितीची मासिक सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. कमल पाटील होत्या. यावेळी उपसभापती रमेश तोडकर व गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागप्रमुखांनी आपल्या कामाचा आढावा सभागृहापुढे ठेवला. यावेळी शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी डॉ. कमलाकर यांनी तालुक्यात ४५९ वर्ग आणि ३५ शाळा डिजीटल झाल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर पाचवी आणि आठवी चाचणी परीक्षेसाठी ९९ टक्केपेक्षा अधिक विद्यार्था उपस्थित होते. सध्या तालुक्यात बारावी परीक्षेची सहा केंद्रे तर दहावी परीक्षेची अकारा केंद्रे कार्यरत आहेत. दोन्ही विभागाच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. याचबरोबर दुर्बल घटक व वंचित विद्यार्थ्यांना 25 टक्के शाळा प्रवेशाच्या आरक्षणाची मुदत ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबरोबरच तालुक्यात शाळा दुरूस्तींचे प्रस्ताव जि.प. ला सादर करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील कसबा सांगाव, केनवडे, बामणी, करनुर, भडगांव, म्हाकवे, बेलवळे, बुद्रूक या सात शाळांच्या दुरूस्तीचे अनुदानरूपात ९ लाख ९५ हजार इतकी रक्कम प्राप्त झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता मुडे यांनी आपल्या विभागाचा आढावा घेतला. कागल तालुक्यातील मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही. ही वस्तूस्थिती त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. खासगी डॉक्टरांकडे मदत मागितल्यास ते तयार होत नाहीत. गोकुळ दूध संघाकडे जी कांही गावे आहेत त्या गावांमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या दूध उत्पादकांनाच ते सेवा देतात. त्यामुळे तालुक्यामध्ये पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. शासनाकडून ज्या कांही लाभाच्या योजना आमच्याकडून शिफारस करून दिल्या जातात त्याचे पुढे नेमके काय होते ? हे आम्हा सदस्यांना समजत नाही. असे न होता मतदारसंघनिहाय माहिती द्यावी, अशी मागणी पूनम मगदूम यांनी केली. शिवाय सिध्दनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कार्यक्रमादिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित राहिले मात्र या कार्यक्रमास स्थानिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते, असा आरोप पूनम मगदूम यांच्यातर्फे करण्यात आला. याची चौकशी करून त्यांची एक दिवसाची पिनपगारी रजा करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर पं. स. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गवळी यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.
आरोग्य खात्याच्या कामकाजाबद्दल माहिती घेताना करंजिवणे गावात अतिसाराची लागण झाली. याची माहिती आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून मिळते. मात्र पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती आम्हाला का मिळाली नाही ? असा सवाल उपसभापती रमेश तोडकर यांनी डॉ. गवळी यांना केला. यावर गवळी यांनी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती दिली. यावर तोडकर यांचे समाधान झाले नाही. माहिती लोकप्रतिनिधींना मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती सौ. कमल पाटील व सदस्य विजय भोसले यांनी पंचायत समितीचे लाभ केवळ दूधगंगा पट्टा म्हणजेच कसबा सांगाव ते बिद्री या पटयातील गावांनाच मिळतात. असा थेट आरोप केला व त्यांनी या भागात मिळालेल्या लाभांची व वेदगंगा पटयातील कापशी, हमिदवाडा परिसरातील गावांना मिळालेल्या लाभांच्या यादीचा पाढा विजय भोसले यांनी वाचून दाखविला. रमेश तोडकर यांनीही याबाबत सहमती दाखवत त्यांच्याही मतदारसंघात हा लाभ पोहचू शकला नसल्याचे सांगितले. यासाठी येथून पुढे सभागृहात ठराव करून मगच पुढील मंजुरूसाठी जि. प. कडे प्रस्ताव पाठवावेत, असा ठराव केला.
वीज वितरण कंपनीच्या विरोधातही सदस्यांकडून बीलाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. कृषी विभाग, लागवड, महिला बालकल्याण, कागल, मुरगूड ग्रामीण रूग्णालय, बांधकाम, कागल एसटी आगार तर महिला समुपदेशन विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा वैशाली नाईक यांनी घेतला. आदी विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मनिषा सावंत, अंजना सुतार, राजश्री माने, जयदीप पोवार, विश्वास कुराडे, ज्योती मुसळे या सदस्यांसह तालुक्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!