News Flash

जेष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : तबल्याचा चालताबोलता ज्ञानकोश समजले जाणारे ‘संगीत नाटक अकादमी’च्या पुरस्काने सन्मानित ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुळगावकर यांनी तबला नवाज उस्ताद अमीर हुसैन खानसाहेब यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षण घेतले होते. गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ‘बंदिश तबला आर्ट प्रमोशन ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली. त्यांची ‘बंदिश’ ही संस्था गेली ४५ वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. मुळगावकर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामवंत कलाकारांना साथसंगत केलेली आहे. पंडित मुळगावकर यांनी बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर ‘तबला’ या ग्रंथाची निर्मिती केली.

तबलानवाज अमीर हुसैन खान या गुरूंच्या कार्याचा समग्र आढावा त्यांनी आपल्या ‘आठवणींचा डोह’ या चरित्रात्मक पुस्तकात घेतलेला आहे. त्यांनी ‘गुस्ताखी माफ’ या छोटेखानी पुस्तकात आपल्या अनेक रचना शब्दबद्ध केल्या आहेत. तबलावादनाची कला त्यांनी नव्या पिढीतील शिष्यापर्यंत पोहचवण्याचे काम निरंतर केले. अर्चिस लेले, कृष्णा मुसळे, सूर्याक्ष देशपांडे आदी त्यांचे शिष्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!