News Flash

ऐनापूरमध्ये चळवळीच्या प्रारंभापूर्वीच नेत्रदान : माने परिवाराचा कृतिशीलतेचा अनोखा आदर्श

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात मागील पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नेत्रदान चळवळीने बाळसे धरले आहे. एखादी गोष्ट गावाने मनावर घेतली की त्याचे चांगले परिणाम कसे समोर येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून ऐनापूरकडे (ता. गडहिंग्लज) पहावे लागेल. नेत्रदान चळवळीचा ऐनापुरात शुभारंभ कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू आहे. तत्पुर्वीच प्रत्यक्ष नेत्रदानाने गावात चळवळीची सुरुवात झाली. लिलाबाई भीमराव माने (वय ६५ ) यांचे आज (बुधवार) नेत्रदान झाले. चळवळीतील हे एकोणचाळीसावे नेत्रदान ठरले.
नेत्रदान चळवळीचा पाचवा वर्धापनदिन आणि ऐनापुरात शुभारंभ असा संयुक्त कार्यकम दोन एप्रिलला होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी रविवार दि. २५ रोजी गावातील मान्यवरांची बैठक झाली होती. दरम्यान आज सकाळी लीलाबाई माने यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने माने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. गावातील प्रमुख मान्यवर, कार्यकर्त्यानी कै. लीलाबाई यांचे चिरंजीव अमृत व अरुण यांचे सांत्वन करुन त्यांना नेत्रदानाबाबत सुचविले. त्यांना नेत्रदानाचे महत्व पटवून दिले.
दु:ख बाजूला ठेवून माने कुटुंबीयांनी पण नेत्रदानाला संमती दिली. त्यानंतर येथील अंकुर आय हॉस्पिटलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने माने यांच्या घरी जाऊन नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया पार पाडली. यातून ऐनापूरकरांनी कृतिशीलतेचा धडा घालून दिला. माने कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या निर्णयामुळे चळवळीला गती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!