News Flash

निकमवाडीत शाळा समायोजीत करण्यास पालकांचा विरोध…

कोल्हापूर (शेखर पाटील) : कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असणाऱ्या राज्यातील १,३१४ शाळा बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पन्हाळा तालुक्यातील ५ वाड्यांचा शाळा समायोजित करण्याच्या प्रस्तावामध्ये समावेश आहे. यातील सुर्वेवाडी आणि मुडेकरवाडी या दोन शाळांचे समायोजन तर अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या निकमवाडीमधील शाळेत करण्यात आले आहे. त्यामुळे पालकवर्ग शाळेत मुले पाठवण्याबाबत अनास्था दाखवत आहेत.

सुर्वेवाडीच्या शाळेत ४ विद्यार्थी आणि २ शिक्षक, तर मुडेकरवाडीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. पण वास्तविक सुर्वेवाडी ते निकमवाडी अंतर अडीच किलोमीटर पेक्षा जास्त असून याठिकाणी रस्ताच नाहीये. शाळेत जाताना डोंगराच्या कड्याकपाऱ्यातून, ओढ्यातून वाट काढत जावे लागते. मग चौथीपर्यंत शिकणारी मुले अशा परिस्थितीत जाणार कशी ? याची भिती पालक वर्गातून उपस्थित होत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, नागरिक, विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविला आहे. बंद होणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या घरापासून समायोजित होणाऱ्या शाळांमधील अंतर ‘आरटीई’नुसार नाही. त्यामुळे पालक आत्तापासूनच घाबरून गेले आहेत.

एकीकडे देश साक्षर बनवण्यासाठी शासन अनेक हालचाली करत आणि दुसरीकडे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय. वाड्या-वस्त्यांवरील शाळेत मुलींना शिक्षण घेण्यासाठी अनास्था असतानाही शासनाच्या निर्णयामुळे अनेक मुली शाळाबाह्य राहणार आहेत. येथील स्थानिक नागरिकांचा शाळा बंद करण्याच्या रेटलेल्या धोरणाला तीव्र विरोध आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेमध्ये तक्रारही त्यांनी दिली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा शिक्षणहक्क कायद्याप्रमाणे (‘आरटीई’नुसार) उत्तम कशा चालविता येईल, यावर सर्वंकष धोरण तयार करायचे सोडून शाळा मोडीत काढण्याचा निर्णय कितपत योग्य हा प्रश्नउपस्थित होत आहे.

राज्यात पूर्वीचेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न प्रलंबित आहे. नोकरी भरती होत नसल्याने हजारो डीएड पदवीधारक बेरोजगारीमुळे अस्वस्थ आहेत. त्यात हे प्रकरण म्हणजे त्यांच्या आशेवर कायमचे पाणी फेरणे म्हणावे लागेल. शासन हळूहळू शिक्षण प्रणालीचे खाजगीकारण करण्यासाठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचे पाऊल उचलत आहे की काय, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!