News Flash

वैद्यकीय क्षेत्राला विविध आव्हानांचा सामना करावा लागणार : डॉ. जयप्रकाश रामानंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भविष्यात वैद्यकीय क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. आधुनिकता, सुरक्षितता, प्रशासन, वैद्यकीय शिक्षण यात बदल होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी काम करताना आपल्या कक्षा रूंदावणे आवश्यक आहे अशी अपेक्षा राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केली. ते आज (शनिवार) कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित हॉस्पिकॉन २०१८ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन हा विषय कधीच शिकवला जात नाही किंवा अभ्यासला जात नाही. वैद्यकीय कायदे , न्याय वैद्यकीय संदर्भ, ग्राहक कायदे याबाबत जागरूक राहावे लागते. याचा विचार करून हॉस्पिकॉन २०१८ या दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असा उद्देश असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे आणि परिषदेचे मुख्य डॉ.दीपक जोशी यांनी विषद केला.
यावेळी विविध विषयांवर तज्ञ डॉक्टर तसेच कायदे तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये जे डॉक्टर आपली प्रॅक्टिस कायद्याच्या चौकटीत राहून करतात त्यांच्या बाजूने कायदा नेहमीच असतो. डॉक्टरांची चूक नसतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल तर रुग्ण आणि नातेवाईक यांना त्याची कल्पना द्या, कागदपत्रांची योग्य पूर्तता करणे, रुग्ण व नातेवाईक यांची संमती घेणे आवश्यक आहे अशी अपेक्षा डॉ. संतोष काकडे यांनी व्यक्त केली.
मूल्ये आणि तत्त्वे पाळा कारण समाज याच गोष्टींवर तुम्हाला ओळखणार आहे असे मत गव्हर्नर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेटन यांनी व्यक्त केले. डॉ. मेटन म्हणाले” डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्यासारखे जगता आले पाहिजे. कमीत कमी गरजा ठेवा, दुसऱ्याशी स्पर्धा करू नये. येणाऱ्या पिढीसाठी कमवून ठेवण्यापेक्षा त्या पिढीला चालना द्या. डॉक्टरांविषयी कोणते कायदे आहेत, रुग्ण हॉस्पिटलमध्ये दगावला तर डॉक्टरांची यात सुरक्षितता काय असेल, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध कसे असावेत, याबद्दल पुण्यातील अॅडव्होकेट आणि डॉ. मनीष माचवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी असोसिएशनचे सचिव डॉ. संदीप साळोखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. अजय शिंदे, डॉ. सरोज शिंदे, डॉ. गीता पिल्लई, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अजित लोकरे, डॉ. सूरज पवार यांच्यासह कोल्हापूरसह कोकण, उत्तरांचल, बेळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी येथून ५०० हून अधिक तज्ज्ञ आणि डॉक्टर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!