News Flash

मराठा आरक्षणप्रश्नी १२ मार्चला कोल्हापुरात गोलमेज परिषद : सुरेश पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साडेतीन वर्षांपासून भाजप सरकार सत्तेत आहे, पण त्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन दिले होते ते अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व संघटना एकत्र येऊन १२ मार्च रोजी कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी गोलमेज परिषद घेऊन पुन्हा एकदा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा महाराष्ट्र मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला. मराठा संघटना, महाराष्ट्रच्यावतीने आज (शनिवार) सायंकाळी दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देतो असे निवडून येणाऱ्या प्रत्येक सरकारकडून आश्वासन दिले जाते. पण निवडून आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडतो. त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण देऊन मराठ्यांच्या मुलांची शिक्षणाची फी शासनाने भरावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. समाजातील अनेक मुलांची शिक्षण घेण्याची परस्थिती नाही. तरी सुद्धा अनेक संकटांना सामोरे जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची फी भरून सहकार्य करावे असे देखील ते म्हणाले.
प्रा. मधुकर पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर या पुढे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जबाबदार असतील. तसेच यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. मराठ्यांच्या मुलांची ६९५ कोर्सेसची फी माफ करतो असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.
या वेळी सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालीच मराठा आरक्षणाचे निर्णय घेतले जातील असा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी बाळ घाटगे, अॅड. सुरेश कुऱ्हाडे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत भोसले, राजू सावंत, परेश भोसले यासह पदाधिकारी व मराठा बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!