News Flash

गडहिंग्लजच्या काळभैरी मंदिराची सुरक्षा रामभरोसे : जीर्णोद्धार समिती, पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष

गडहिंग्लज (नितीन मोरे) : गडहिंग्लजपासून पाच कि.मी.अंतरावर डोंगर कपारीत वसलेल्या काळभैरीच्या मंदिरामध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देणगी पेटीतील रकमेवर डल्ला मारला. येथे दर्शनासाठी कर्नाटक, गोवा व इतर राज्यातील लाखो भाविक येत असतात. मात्र या मंदिराच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था न केल्याने चोरीचा प्रकार घडलाय.
जीर्णोद्धार कमिटी, देवस्थान समिती, राजकीय नेते यांचेबरोबरच काही प्रमाणात गडहिंग्लजवासीयही जबाबदार असल्याची चर्चा आहे.
या मंदिरात समाजकारणी व राजकारणी लोकांची ये-जा देखील सर्रास असते, पण देवाचा आशिर्वाद घेऊन पाठ फिरवली की, मात्र मंदिराकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. निवडणुका आल्या की अभिषेक, कौल लावणे हे प्रकार सुरू होतात. इतकेच काय प्रचाराचा नारळही इथेच फुटतो, पुन्हा ये रे माझ्या मागल्या..! अशा स्वार्थी नेत्यांमुळेच काळभैरी मंदिरासह परिसराचा विकास खुंटला आहे. तसेच काळभैरीच्या मंदिरात सुरू असलेले राजकारण देखील अशा गोष्टींना कारणीभूत आहे. येथील जीर्णोद्धार कमिटी, गुरव समाज व तेथील गोंधळी यांच्यात असणारा वाद…. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज पाहिले तर आठ ते दहा फ़ूट अंतरावरचे काही दिसत नाही. अत्यंत हलक्या दर्जाचे कॅमेरे बसविले आहेत. दररोज गाभाऱ्यामध्ये धुपारती, कापूरारती असते. त्याच्या धुरामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर धूळ साचली आहे. याचा पत्ता देखील येथील कारभाऱ्यांना नाहीये.
जीर्णोद्धार समिती तर काय काम करते ते एक तर देवास ठाऊक किंवा त्या कमिटीतील सदस्यांनाच ठाऊक..! अनेक दशके नुसते कामच सुरु आहे. जीर्णोद्धार समिती, गुरव आणि बुवा (गोंधळी) समाज यांच्यात वाद आहेत. त्यात आता भर पडलीय ती देवळाच्या मंडपाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही या परिसराचा विकास मंदगतीने का होत आहे, सुविधा पुरेशा मिळत नाहीत, याबाबत संबंधित ‘कारभाऱ्यां’ना जाब विचारण्याची गरज भासत नाही. दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे असा प्रकार सुरू आहे.
या मंदिर परिसरात पिण्याच्या पाणी, स्वच्छतागृहासारख्या उपलब्ध नाहीत, मग इतर गोष्टी मिळणे तर दूरच राहिले… भाविकांकडून मिळणारी देणगी लाखोंच्या पटीत आहे, मग देवाच्या नावाने जमा होणाऱ्या पैशात किमान एक सुरक्षा रक्षक नेमता आला नसता का? ना भक्त निवास, ना बगीचा, ना वेळेत रंगरंगोटी…ना इतर सुविधा… मग हा पैसा मुरतो कुठे? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला बऱ्याच वर्षानंतर अध्यक्ष मिळाला, इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली. मग ही समिती तरी या मंदिरातील सुविधा पुरविण्याकडे लक्ष देईल का? असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे कधी मिळणार कोणास ठाऊक…
किमान आता तरी गडहिंग्लजच्या लोकांनी सुधारण्याची वेळ आली आहे. निदान देवाच्या मंदिरामध्ये तरी राजकारण आणू नका. आपण जसे मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढून जातो तसे आपापसातील वाद बाहेर ठेवले तर ते योग्य नाही का होणार?

One thought on “गडहिंग्लजच्या काळभैरी मंदिराची सुरक्षा रामभरोसे : जीर्णोद्धार समिती, पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!