News Flash

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रत्येक बसस्थानकावर ‘वाचन सप्ताह’ : दिवाकर रावते

मुरगूड (प्रतिनिधी) : ज्येष्ठ कवी, कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी) हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकावर दि. २७ फेब्रुवारी ते ५ मार्च अखेर ‘मराठी वाचन सप्ताह’ साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
रावते यांनी सांगितले की, सप्ताहानिमित्त प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार असून विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्रे यांच्याद्वारे प्रवास व एसटी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात मराठी पुस्तकांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मराठी पुस्तक प्रकाशनसंस्था व विक्री दुकानांना बसस्थानकावर पुस्तक विक्री दालन उभे करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी योग्य माध्यम असल्यामुळे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून तीन वर्षे ‘एसटी’ महामंडळात विविध उपक्रमाद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा केला जात आहे. आजकाल धावपळीच्या जीवन पद्धतीमध्ये आपली वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. विविध समाजमाध्यमांच्या (व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर) आहारी गेलेल्या नव्या पिढीला मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले आहे. बसस्थानकावर प्रवासानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांना मराठी पुस्तके खरेदीसाठी सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी ही पुस्तक विक्रीची दालने उभारण्यात येणार आहेत. या निमित्ताने एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख प्रवाशांना प्रवासवर्णने, विविध लोकनेत्यांची चरित्रे, कथा- कादंबऱ्या, काव्यसंग्रह, मौलिक ग्रंथ असे साहित्य उपलब्ध होणार आहे. याचा लाभ प्रवाशांनी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!