News Flash

गडहिंग्लजमध्ये आजरा रस्त्यावर अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाढले अपघात

गडहिंग्लज (नितीन मोरे) : गडहिंग्लजमधील आजरा रस्त्यावर दररोज होणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले असून या रोड वरून नागरीक गाडी किंवा पायी प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करीत आहेत. काही दिवसांपासून या रोडवर अपघातांची संख्या वाढली असून यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
संकेश्वर–आजरा-आंबोली हा राज्यमार्ग असल्यामुळे या मार्गावरुन सर्वात जास्त वाहतूक होते. तर गोव्यासाठी, कोकणात जाणारे पर्यटक देखील याच मार्गावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता खुला असणे गरजेचे असताना मात्र दुपारी चारनंतर अवजड वाहने, खाजगी बसेस तसेच दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्याच्या बाजूने पार्किंग केल्या जातात. त्यामुळे वाहतुकिला अडथळा येऊ लागल्याने अपघाताचे प्रमाण या रोडवर वाढले आहे. दररोज गडहिंग्लज मधून किमान दहाच्या वर ट्रॅव्हल्स बसेस मुंबई व पुणेकरिता रवाना होतात. आजरा रोडवर असणाऱ्या वारणा बझारपासून धन्वंतरी मेडिकलपर्यंत इंगवले हॉस्पिटलपासून ते चर्च रोडच्या निम्या रस्त्यापर्यंत पर्यत ह्या ट्रॅव्हल्स बसेस उभ्या असतात. त्यांचा वाहतुकीला अडथळा होतोच. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खाजगी दुकानदारांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना सोडायला येणाऱ्या गाड्या देखील अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जातात. त्यामुळे हा राज्यमार्ग पार्किंगसाठी आहे की वाहतुकीसाठी असा प्रश्न वाहतूकदारांना पडत आहे.
आठवडा बाजारादिवशी या रस्त्यावर सकाळपासून ते संध्याकाळी नऊपर्यंत वाहनांची प्रचंड रांग लागलेली असते. कारण आठवडा बाजाराचे नियोजन असल्यामुळे त्या दिवशी वाहने आजरा रोड व चर्च रोड मार्गे वळवली जातात. त्या दिवशी पुणे, मुंबईला जाणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक असते. त्यामुळे रविवारी या रस्त्यावरून चालत जाणे देखील कठीण झालेले असते.
इंगवले हॉस्पिटलसमोर आजऱ्याकडून येणाऱ्या बस देखील येथेच उभ्याकेल्याने चर्च रोडवरून येणाऱ्या वाहनधारकांना समोरून येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत. त्यामुळेच या कॉर्नरला बरेच अपघात झाले आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाने देखील बस थांबण्याची जागा बदलणे गरजेचे आहे. अन्यथा अशा बेपर्वा पार्किंगमुळे एखादयाचा जीव देखील जाऊ शकतो, याचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन आजरा रस्त्यावरील हे पार्किंग बंद करण्याची कारवाई कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

One thought on “गडहिंग्लजमध्ये आजरा रस्त्यावर अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाढले अपघात”

  1. नितीन साहेब
    हा मुद्दा अगदी बरोबर आहे, मी सहमत आहे, याचा आम्हाला खूप त्रास होत आहे। प्रशासनाला हप्ते मिळतात ना,,,पोलीस लोक यांना साथ देतात, हे वेळीच बंद झाले पाहिजे, आम्हाला दुकानाच्या समोर ही मोठ्या वाहनांची वर्दळ आता सहन होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!