News Flash

‘गुळं’ काढण्याच्या निमित्ताने टिक्केवाडी ग्रामस्थांनी ठोकला शिवारात मुक्काम

गारगोटी (सहदेव साळोखे) : धनगर समाजाच्या मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आणि रोगराईपासून मुक्ततेसाठी सध्या भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी ग्रामस्थांनी आपला संसार चक्क शेतशिवारात थाटलाय. धनगरी पांढर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या या गावात ‘गुळं’ काढण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या सुरु आहे. मंगळवार दि. २० फेब्रुवारीपासून टिक्केवाडीकर देवीचं नांव मुखात ठेवत मुक्त जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत.
गर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं ‘टिक्केवाडी’ हे छोटेखानी गाव. अष्टभुजा म्हणजेच भुजाई हे या गावचे ग्रामदैवत. देवीवर नितांत श्रध्दा असणारे इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला ‘गुळं’ काढतात. गुळं काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही, सर्वानी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं हा इथला दंडक. धनगराप्रमाणे भटकंती करून आरोग्य कमवायचं, शुध्द हवेत राहणे तसेच पशुप्राण्याची मुलालेकरांना ओळख करुन द्यायची आणि वनौषधींचा शोध घ्यायचा हा या प्रथेमागचा हेतू. माघवारी नंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. प्रथेच्या निमित्ताने सर्वांच एकत्र राहणं होतं. त्यांमुळे आपापसातील वादही निवळून जातात, जातीपातीची बंधने गळून पडतात.
देवीच्या नावाचा जयघोष करत या गावकऱ्यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्याला हि मंडळी ‘गुळं’ म्हणतात. सारवलेली जमीन …दगडाच्या चुलीतल्या विस्तवावर रटरट फुगणारी भाकरी…तव्यामध्ये शिजणा-या भाजीचा खमंग वास आणि शिंकाळ्यावर झुलत असलेली दह्याची हंडी हे चित्र प्रत्येक पालामध्ये पहायला मिळतं. गावात शुकशुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरूआहे. इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एक तरी व्यक्ती आढळते. पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते,भजन आदी कलामध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पै-पाहुणे एक-दोन दिवस गुळ्यात राहण्यासाठी आवर्जून येतात.
आई भुजाई गावकऱ्यांचे संरक्षण करते ही इथल्या लोकांची श्रध्दा आहे. देवीला कौल लावून गावकरी ‘गुळं’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचावाडा, बसुदेवाचा वाडा, हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते. पण अलीकडे हि प्रथा शेतशिवारात पाळत आहेत. प्रथे दम्यान संपूर्ण गावात चिटपाखरूही नसते. या काळात घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे-जेवण बनवणे, दिवा पेटवणे व घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात पण यावेळी चोरीसारखे हीन प्रकार अजिबात होत नाहीत. शिवारात २५-३० कुटूंबासाठी एकच पाल उभारले जाते. संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आनंद घेत असतात. टिक्केवाडी ग्रामस्थांच्या या अनोख्या प्रथेची सर्वत्र चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!