News Flash

महावितरणमधील अनागोंदीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका : सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणने २०१४-१५ पासून शेती पंपांना नवीन विद्युत कनेक्शन दिलेली नाहीत. यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही बऱ्याच शेतक-यांना शेतीला पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. परिणामी सरासरी वार्षिक उत्पन्न कमी होवून शेतक-यांना आर्थिक फटका बसला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी आज (गुरुवार) शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरणवर काढलेल्या मोर्च्याच्या वेळी केले.

यावेळी हा मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, आदित्य कॉर्नर या मार्गावरुन ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चाद्वारे जाऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी आ.सतेज पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची एकूण वीज बिल वसुली पाहता कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमाण ९० टक्के आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची वीज गळतीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याची वीज गळती सर्वात कमी म्हणजे फक्त ९ ते १० टक्के आहे. वीज बिलाची वसुली चांगली असूनही भारनियमनामुळे २४ तासापैकी फक्त ८ ते १० तास वीज पुरवठा होत आहे. भारनियमनाची वेळ कायम बदलत असल्याने शेतक-यांना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज गळती रोखणे आणि थकबाकी वसुल करणे ही महावितरणची जबाबदारी आहे.

शेतीसाठी कमीत कमी १२ तास विद्युत पुरवठा व तो ही दिवसा मिळणे आवश्यक आहे. काही ग्राहकांची मीटर नादुरुस्त असल्यामुळे मीटर रिडींग योग्य प्रकारे होत नाही. नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी महावितरण कंपनीकडे मीटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अयोग्य व चुकीची बिले दिली जात असल्याने त्याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याचेही ते म्हणाले. या मोर्चाला शेतकरी बांधव आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!