News Flash

लोकसभेसाठी मुश्रीफ-महाडिक की मंडलिक-महाडिक?

गडहिंग्लज (नितीन मोरे) : राष्ट्रवादीत असूनही जिल्हा पातळीवर भाजपला मदत करणारे खा. धनंजय महाडिक यांच्यावर आ. हसन मुश्रीफ नाराज आहेत. ते राष्ट्रवादीचे नसून ताराराणी आघाडीचे खासदार आहेत, अशा शब्दात आ. मुश्रीफ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आता तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे मी किंवा प्रा. संजय मंडलिक हेच उमेदवार असतील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतर्फे लढण्याची संधी मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाडिक भाजपच्या वळचणीला अधिकृतपणे जातील आणि मुश्रीफ व त्यांच्यातच खासदारकीसाठी लढत होईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
कागल तालुक्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचे विद्यापीठ मानले जाते. या तालुक्याने अनेक दशके मंडलिक-घाटगे वाद अनुभवला आहे. कालांतराने राजे विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यातील कटुता संपली. आता हे दोघेही नेते हयात नाहीत. त्यामुळे तालुक्याचे नेतेपद आपसूकच आ. हसन मुश्रीफ यांचेकडे आले आणि त्यांनी ते सांभाळलेही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे ते विश्वासातले आणि खंदे कार्यकर्ते. आपल्या चाणाक्ष राजकीय खेळीमुळे त्यांनी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, महानगरपालिका, जिल्हा बँक या सत्ताकेंद्रावर राष्ट्रवादीचे वर्चस्व ठेवले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक आणि विधानपरिषदेवर सतेज पाटील यांना निवडून आणून आपणच ‘किंगमेकर’ असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
मात्र आता मुश्रीफ काही दिवसापासून स्वतः लोकसभेच्या रणांगणात उतरण्याचे सांगत असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा वेगळी दिशा मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गत निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पक्षात घेऊन हसन मुश्रीफ यांनी स्वतः तिकीट मिळवून दिले. संपूर्ण जिल्ह्यातील आपले नेटवर्क आणि प्रतिष्ठा पणाला लावून नरेंद्र मोदींची हवा असताना देखील धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली. पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच महाडिक आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाली. काही दिवस क्वचितच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात महाडिक दिसून आले. महानगरपालिका निवडणुकीपासून तर हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्यात दुरावा निर्माण होत गेला. धनंजय महाडिक पक्षविरोधी भूमिका घेतात, अशी टीका मुश्रीफ यांनी कित्येक वेळा केली, पण त्याचा खा. महाडिक यांच्यावर काहीच फरक पडला नाही.
जिल्ह्यातील राजकारणात मुश्रीफ जो निर्णय घेतात, तो पक्षाच्या वरिष्ठांना मान्य असतो, असे बोलले जाते. त्यामुळे मंडलिक पक्षात आले तर माझ्या सूचनेनुसार त्यांना उमेदवारी मिळेल नाहीतर मला स्वत:ला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे असे सूचक वक्तव्य स्वतः मुश्रीफ यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी कागल तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात देखील त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. मात्र दोन्ही वेळी त्यांनी जर संजय मंडलिक राष्ट्रवादीत आले तर त्यांना तिकीट मिळू शकते अन्यथा मलाच लढावे लागेल असे वक्तव्य केल्यामुळे महाडिक यांना पुन्हा पक्षातर्फे लढण्याची संधी मिळणे जवळपास अशक्य आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीसमोर फक्त मी आणि संजय मंडलिक हे दोनच पर्यायी उमेदवार आहेत असेच मुश्रीफ यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले खा. शरद पवार यांनीही महाडिक व मुश्रीफ यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या दौऱ्यात धनंजय महाडिक यांनी आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न देखील केला. पवार यांनी या दोघांतील वादाबाबत एक शब्दही काढला नाही की महाडिक यांना कानपिचक्या दिल्या नाहीत.
पण दौऱ्यानंतर हसन मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी मंडलिक किंवा मी असे जाहीर वक्तव्य केल्याने जे मुश्रीफांच्या तोंडात तेच शरद पवार यांच्या मनात असेल का..? तसे झाल्यास धनंजय महाडिक काय करतील, याकडे सर्वांचे लक्ष असेल. अर्थात, लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. राष्ट्रवादीत शरद पवार यांचाच शब्द अंतिम मानला जातो. राजकारणात काहीही घडू शकते, वर्षभरात नवी राजकीय समीकरणे उदयाला येऊ शकतात. त्यामुळे आताच महाडिक यांचा पत्ता राष्ट्रवादीतून कट होईल, असे निश्चित सांगता येत नाही. मात्र, मुश्रीफ यांच्या आताच्या नव्या पवित्र्याने राष्ट्रवादीसह महाडिक यांच्या गोटात अस्वस्थता आहे, हे नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!