News Flash

शिवाजी पुलावरील वाहतूक बंदचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना…

कोल्हापूर (शेखर पाटील) : मागील महिन्यात मिनी बस शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत कोसळून १३ जणांना प्राण गमवावे लागले होते. या अपघातानंतर भार तपासणीच्या निमित्ताने पूल तातडीने अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याचा फटका सर्व प्रवाशांबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. आजपासून (बुधवार) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. शिवाजी पुलाच्या पलीकडील बाजूला असलेल्या गावांतील नागरिकांना आपल्या पाल्यांना आज दुचाकीवरून कोल्हापूरमधील महाविद्यालयात परीक्षेसाठी सोडायला येणे भाग पडले. प्रशासनाने हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
मागील महिन्यात घडलेल्या अपघातानंतर प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थी, रूग्ण शहरात कसे यायचे याचा विचार न करता पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याची पर्यायी व्यवस्थाही करून दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळ आणि पैशाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. कोल्हापूर कोकणला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. शिवाजी पूल बंद असल्यामुळे एस.टी. च्या सर्वच फेऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामूळे प्रवाशांना २० ते २५ रुपये वाढीव तिकिटांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय पास धारकांनासुध्दा वाढीव तिकीट दर द्यावा लागत आहे. शिवाजी पुलावरून रोज १५ हजारांवर वाहने ये-जा करत असल्याचा अंदाज वाहतूक शाखेकडे आहे. त्यातील २० हजारांहून अधिक नागरिक एस.टी. ने प्रवास करत असतात. पर्यायी मार्गामुळे होणाऱ्या वाहतुकीचा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप होत आहे. मुलांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शहरात कॉलेजला सोडण्यासाठी दुचाकीवरून कोल्हापूरपर्यंत येत आहेत. याचा प्रशासनाने विचार करून तत्काळ पर्यायी उपाययोजना करण्याची गरज आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत…
ग्रामीण भागातील विद्यार्थी कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी येत असतात. शिवाय आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून पर्यायी मार्गाने केलेल्या वाहतुकीमूळे विद्यार्थ्यांचा अधिक वेळ वाया जात आहे. प्रशासनाच्या गैरसोयीमुळे बारावीच्या विद्याथ्र्यांना घारातून लवकरच बाहेर पडून मोठी कसरत करत परीक्षा केंद्रापर्यत पोहचावे लागत आहे. त्याचा अभ्यासावरदेखील परिणाम होत आहे. या सगळ्याचा प्रशासनाने देखील विचार करण्याची गरज आहे.
पर्यायी उपाययोजना
रत्नागिरी मार्गावरील वाहतूक शिये, भुये, कुशिरे, पोहाळे मार्गे रत्नागिरी अशी होत आहे. ग्रामीण भागातील या पुलावरून होणारी वाहतूक ही पुलाच्या अलीकडे असलेल्या पाटील पेट्रोलपंप येथून तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावी जेणेकरून ग्रामीण भागातील प्रवाशांची ससेहोलपट थांबेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!